चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर येथे आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन
शाश्वत समस्यांचे निराकरण व कौशल्य प्रशिक्षण"
शिरूर प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर (घोडनदी), पुणे यांच्या वतीने, भौतिकशास्त्र विभाग व बी.व्होक. (Renewable Energy) आणि युनिव्हर्सिटी ऑफ साउथ आफ्रिका यांच्या संयुक्त विद्यमाने, दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोजी एकदिवसीय इंडो-आफ्रिका आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचा मुख्य उद्देश शाश्वततेसंबंधित समस्यांचे निराकरण व कौशल्यविकासावर चर्चा आणि यावर उपाययोजना शोधणे हा होता.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.सी. मोहिते यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे स्वागतपर प्रास्ताविक केले. प्रस्तावने मध्ये त्यांनी शाश्वततेच्या क्षेत्रातील नवकल्पनांचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख वक्ते प्रा. भरत बी. काळे (संशोधन संचालक, एम.आय.टी. वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे) यांनी भविष्यातील वाहतुकीसाठी हायड्रोजन निर्मिती आणि त्याच्या शाश्वत उर्जेतील भूमिकेवर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. डॉ. अशोक व्ही. जोशी (सी.ई.ओ., मायक्रोलिन टेक्नॉलॉजी, यू.एस.ए.) यांनी उद्योजकता, भविष्यातील विदेशामध्ये असलेल्या उपलब्ध संधी आणि भारत व अमेरिकेच्या आर्थिक प्रगतीची तुलना करत जागतिक स्तरावरील आर्थिक विकासावर विचार मांडले. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्राचार्य नंदकुमार निकम यांनी शाश्वतता समस्या, त्यावरील उपाययोजना, तसेच भावी पिढ्यांसाठी कौशल्यविकासाचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त मा.प्रकाशजी बोरा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
दुपारच्या भोजनानंतर प्रा. व्ही.एस. वल्लभपुरापू (युनिव्हर्सिटी ऑफ साउथ आफ्रिका) यांनी री-रॅम तंत्रज्ञानातील संधींवर माहिती दिली. प्रा. श्रीदेवी वल्लभपुरापू (युनिव्हर्सिटी ऑफ साउथ आफ्रिका) यांनी दक्षिण आफ्रिकेतील विद्यापीठांच्या शिष्यवृत्ती व प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले. डॉ. फुलुफेलो नेमंग्वेले (युनिव्हर्सिटी ऑफ वेन्डा, साउथ आफ्रिका) यांनी ग्रामीण भागातील संमिश्र उर्जेसाठी ब्लॉकचेन व आर्थिक व्यवस्थापनाच्या संभाव्य उपयोगांवर व्याख्यान दिले.
सदरच्या कार्यशाळेमध्ये सुमारे १२५ प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग दर्शवला. तसेच कार्यशाळेमध्ये उपस्थितांचा प्रश्नांना वक्त्यांनी उत्तरे दिले.याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एच.एस.जाधव, विज्ञान विद्याशाखाप्रमुख डॉ.एन. एम.घनगावकर उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ.सतीश पाटील यांनी केले.कार्यक्रमाचा समारोप डॉ. डी.एच. बोबडे (कार्यक्रमाचे समन्वयक) यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. ही कार्यशाळा भारत व दक्षिण आफ्रिकेमधील शाश्वततेसंबंधित जागतिक समस्यांवर सहकार्य व ज्ञानविनिमयासाठी यशस्वी ठरली.
